Headlines

मारुती चितमपल्ली – एका अरण्यऋषींना अखेरचा निरोप!

एका अरण्यऋषींना अखेरचा निरोप!

हेमराज बागुल : थोर साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी ऑक्टोबर – २०२० मध्ये नागपूर या कर्मभूमीतून सोलापूर या जन्मभूमीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विदर्भवासियांनी त्यांना प्रातिनिधिक स्वरुपात निरोप दिला होता. त्यासाठी नागपुरात प्राचार्य स्व. राम शेवाळकर यांच्या निवासस्थानी श्री. आशुतोष शेवाळकर यांच्या पुढाकाराने अतिशय भावस्पर्शी कार्यक्रम झाला. त्यावेळी मी नागपूर येथे माहिती संचालक म्हणून कार्यरत होतो. कोविड – १९ विषाणू साथीमुळे छोटेखानी स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून मला त्यांनी अतिशय अगत्याने बोलावले. एका महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवन प्रवासातील एका हळव्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मला त्यानिमित्ताने लाभली!

नव्वदीतल्या चितमपल्ली सरांचे निम्मे आयुष्य गेले ते विदर्भात! मात्र ते सोलापूर येथील रहिवासी. या ऋषीचं मूळच शोधायचे झाले तर मूळचे ते तसे तेलुगू. पण नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आले आणि विदर्भाचेच झाले. इथली सारी जंगले त्यांनी पायाखाली घातली. त्यातले पक्षी, प्राणी, वृक्ष या साऱ्यांमध्ये दडलेलं एक अद्भुत जगणं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. श्रेष्ठ साहित्यिक हा साहित्यासोबत भाषाही संपन्न करत असतो. या निकषावर चितमपल्ली सरांचे मोठेपण आणि योगदान शब्दशः अफाट आहे. परभाषांच्या आक्रमणामुळे आकसत चाललेल्या मराठीला त्यांनी शब्दशः हजारो नव्या शब्दांचं योगदान दिलंय. इंग्रजीतील काही शब्दांना अतिशय सोपे आणि समर्पक असे पर्यायी शब्द दिलेत. उदा. रातनिवारा. देशी भाषांसोबत जर्मन आणि रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केलाय. आपल्या साहित्यातले संदर्भ अचूक असावेत म्हणून वयाच्या ८४ व्या वर्षी संस्कृतसारखी भाषा तेच शिकू शकतात!

गेली ८ दशके ते डायरी लिहित. त्यातलं खूप काही प्रसिद्ध व्हायचं अजून बाकी आहे! पक्षीकोश यापूर्वी प्रसिद्ध झालाय. प्राणिकोश आणि वृक्षकोशाचेही काम झालेय. मत्स्यकोशावर त्यांनी काम केले. ही सारी कामे प्रचंड धडपडीची आणि भावी पिढ्यांसाठी अत्यंत मोलाची आहेत. मराठीत यासंदर्भात एवढ्या उंचीचे कार्य यापूर्वी झालेले नाही.

याशिवाय त्यांच्या डोक्यात अजून खूप सारे लिखाण प्रस्तावित होते. सोलापूरला गेल्यानंतर पुन्हा लिहिण्याचा हा जागर त्यांनी उमेदीने चेतवला होता. तेही आयुष्याच्या अशा घनगर्द सायंकाळी! जगण्याची ही दुर्दम्य आकांक्षा येते ती निसर्गाच्या निखळ संस्कारातून. जो चितमपल्ली यांनी आयुष्यभर अनुभवला!

आजवरच्या आयुष्यातली ६५ वर्षे जंगलात घालवणाऱ्या या अरण्यव्रतीच्या चेहऱ्यावर एक कृतार्थ सफलता आणि कृतज्ञता सदासाठी विलसत असे. मुळात त्यांचा स्वभाव शांत अन् सोशिक, संन्यासी वृत्ती, निसर्गाप्रती निस्सीम श्रद्धाभाव, व्रतस्थ कर्तव्यनिष्ठा, अविरत धडपड आणि सृजनशील रसिकता या साऱ्यांच्या मिलाफातून तयार झालेले त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे साहित्यमंदिराच्या गाभाऱ्यात शांतपणे तेवत असलेला नंदादीपच जणू!

जागतिक कीर्तीचे थोर पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली हे त्यांचे गुरू. ते एकदा म्हणाले, ‘चितमपल्ली, तुमचं जीवन मला द्या अन् माझं जीवन तुम्ही घ्या!’ एका महान गुरूने आपल्या तितक्याच महान शिष्याबद्दल काढलेले हे उद्गार चितमपल्ली सरांबद्दल सारं काही सांगणारे आहेत!

थोर साहित्यिक जयंत नारळीकर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. साचेबद्ध मराठी साहित्य त्यांनी वैज्ञानिक प्रयोगशाळेत नेले. तर चितमपल्ली सरांनी हे साहित्य आणि त्याच्या वाचकाला बोट धरून थेट रानावनात नेले. रुढ वहिवाट बदलणाऱ्या अशा श्रेष्ठ साहित्यिकांमुळे केवळ साहित्यच नव्हे तर भाषा, संस्कृती आणि वाचकांचे भावविश्व असे सारेच काही समृद्ध होत असते!

मराठी साहित्य आणि संस्कृतीला ही अफाट समृद्धी बहाल करणाऱ्या चितमपल्ली सरांचे आम्ही चिरंतन ऋणी आहोत !

– हेमराज बागुल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *