निलंग्यावर निलंगेकरांचं निर्विवाद वर्चस्व!
अवघ्या मराठवाड्याच लक्ष वेधलेल्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अभूतपूर्व यश संपादन करून पालिका निवडणुकीत आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे!
यावेळची निलंगा नगरपालिकेची निवडणूक तशी भलतीच गाजली! भाजप, काँग्रेस, शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी अशी वरकरणी चौरंगी लढत वाटत असली तरी खरी लढत मात्र ही दुरंगीच होती.परंतु नगराध्यक्षपदाची लढत ही भाजपचे संजय हलगरकर,काँग्रेसचे हमीद शेख व शिवसेना- राष्ट्रवादीचे लिंबन महाराज रेशमे यांच्यात असल्याचे चित्र होते.परंतु सदरील लढत देखील शेवटच्या टप्प्यात दुरंगीच ठरली!
भाजपच्या पॅनल समोर काँग्रेस पॅनलने मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र निर्माण झाले होते.काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातल्याने पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील विरुद्ध काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख असा सामना रंगला होता.
मागील निलंगा विधानसभा निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे गेलेले अभयदादा साळुंके दरम्यानच्या काळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्याने पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी जोर लावत ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली होती.निवडणूक जाहीर झाल्यापासून अभयदादा साळुंके हे निलंगा शहरात तळ ठोकून होते.पालिकेच्या मागील पाच वर्षाच्या काळात भाजपने शहराचा विकास केला नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रचारादरम्यान भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.आमदार अमित देशमुख यांची सभा,माजी आमदार धीरज देशमुख यांची रॅली, प्रचारसभा, कॉर्नर बैठका व पदयात्रा या माध्यमातून काँग्रेसने शहरातील वातावरण पुरते ढवळून काढल्याने काँग्रेसचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात होते.काँग्रेससाठी जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके,नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख व पॅनल प्रमुख अजित नाईकवाडे यांनी जीवाचं रान केलं होतं तर दुसऱ्या बाजूला शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार लिंबन महाराज रेशमे यांनी शहरात रॅली,कॉर्नर बैठका व प्रत्यक्ष भेटीचा सपाटा लावल्याने त्यांच्या उमेदवारीची शहरात भलतीच हवा होती.परंतु ही हवा केवळ हवेतच राहिली! या हवेचे मतदानात मात्र परिवर्तन करण्यात त्यांना यश आले नाही.या निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेस व शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसची हवा होती.त्यामुळे भाजप गोटात अस्वस्थता जाणवत होती.परंतु संभाजीराव व अरविंदराव या निलंगेकर भावंडांनी प्रचार यंत्रणेवर आपली पकड सुरुवातीपासूनच मजबूत ठेवली होती.महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे या नेत्याची मोठी सभा, प्रचार रॅली, पदयात्रा, कॉर्नर बैठका व सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोअर टू डोअर कॅम्पेनने निलंगेकर भावंडांनी शहर अक्षरश: पिंजून काढत भाजपकडे विजयश्री खेचून आणली.विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे संभाजीराव पाटील अजिबात विचलित न होता शांत,संयतपणे स्वतःला प्रचारात कमालीचे झोकून दिले होते.आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे नेते आहोत हे लोकांमध्ये बिंबविण्यामध्ये संभाजीराव पाटील या निवडणुकीत मोठे यशस्वी ठरले! तर मॅनेजमेंट गुरुंचे या निवडणुकीतील मायक्रो मॅनेजमेंट खरंच अफलातून होतं! युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी मीडिया,सोशल मीडियाचा खुबीने वापर केला. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला निलंगा शहरात 250 चे मताधिक्य कमी असतानाही भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना मोठं बळ देत तगडी प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष संजय हलगरकर व 15 नगरसेवक विजयी झाले!भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय निश्चितच संभाजीराव पाटील, अरविंद पाटील, पॅनल प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,नगराध्यक्ष संजय हलगरकर यांच्याबरोबर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाला जाते. आजचा हा निकाल पाहता संभाजीराव पाटील यांनी काही चुकीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाले.उमेदवारी देताना विशेष काळजी घेतली असती तर 15 नगरसेवकाच्या या आकड्यामध्ये निश्चितच भर पडली असती! कार्यकर्त्यांची निवडणूक ही आपली निवडणूक समजून लढणारे संभाजीराव पाटील यांनी या पालिका
निवडणूकीत मोठं यश संपादन करून निश्चितच राजकीय करिष्मा घडवून आणला आहे. भाजप पक्षश्रेष्ठीने सोपविलेली जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी ही धुरा त्यांनी अत्यंत यशस्वी करून दाखवली आहे. एकूणच निलंगा नगरपालिकेचा हा निकाल म्हणजे लातूरच्या होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची नांदी आहे असे म्हंटल्यास काही वावगे होणार नाही, हे मात्र निश्चित!
लेखन : प्रा .प्रदीप मुरमे


