Headlines

निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून हरिभाऊ सगरे तर काँग्रेसकडून प्रा.डॉ. गजेंद्र तरंगे यांची बिनविरोध निवड झाली!

प्रदीप मुरमे: (८/१/२०२६)- निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून हरिभाऊ सगरे तर काँग्रेसकडून प्रा.डॉ. गजेंद्र तरंगे यांची बिनविरोध निवड झाली! सगरे यांची निवड अपेक्षित तर तरंगे यांची निवड अनपेक्षित अशीच म्हणावी लागेल.

निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी दोन जागा असल्याने या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे यापदी नेमकं कोणाची वर्णी लागणार याबाबत पालिका वर्तुळात कमालीचे औत्सुक्य लागून राहिले होते! भाजपाकडून पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून भाजपमध्ये दाखल झालेले माजी उपजिल्हाप्रमुख तथा पत्रकार हरिभाऊ सगरे यांची भाजपकडून बिनविरोध निवड झाली आहे! पालिकेत भाजपाची पुन्हा सत्ता आल्याने साहजिकच भाजपाकडून स्वीकृत सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी अनेकजण इच्छुक होते.परंतु या पदासाठी हरिभाऊ सगरे हेच खऱ्या अर्थाने प्रबळ दावेदार होते.पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी संभाजीराव व अरविंदराव या निलंगेकर भावंडांनी काही राजकीय खेळी खेळल्या होत्या.त्यामधील एक खेळी म्हणजे शिवसेनेतील एक आक्रमक चेहरा,दांडगा जनसंपर्क व पालिकेच्या राजकारणाचा चांगला अभ्यास असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे हरिभाऊ सगरे होय! या पार्श्वभूमीवर निलंगेकर भावंडांनी हरिभाऊ सगरे यांना गळाला लावत ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात त्यांचा प्रवेश घडवून आणला.निलंगेकर बंधूंनी शब्द टाकतात कसलीही अट न ठेवता सगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रभाग 3 मधून नगरसेवक पदाची हमखास उमेदवारी दिली जाईल असा राजकीय जाणकारांचा कयास होता.परंतु हरिभाऊ सगरे यांच्या ऐवजी शेवटच्या क्षणी ईश्वर पाटील यांची उमेदवारी फायनल करण्यात आली. ईश्वर पाटील यांची उमेदवारी फायनल करतानाच भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी हरिभाऊ सगरे यांना स्वीकृत सदस्यपदी घेण्याचा शब्द दिला होता. प्रभाग तीन मधून उमेदवारी देण्यात आली नसली तरी नाराज न होता सगरे यांनी भाजप पक्षांनी पालिका निवडणूकीत त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडली.

अन् अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिलेला शब्द पाळला!

प्रभाग तीन मधून दोन्ही नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेत स्वीकृत सदस्यपदी हरिभाऊ सगरे यांची निवड होईल असा अनेकांचा अंदाज होता.अन् तो अंदाज युवा नेते अरविंद निलंगेकर यांनी हरिभाऊ यांना दिलेला शब्द पाळल्यामुळे अखेर आज तंतोतंत खरा ठरला. ही निवड पाहता हरीभाऊ सगरे यांची निलंगेकर यांच्या प्रति असलेली असलेली निष्ठा फळाला आली. या निवडीबद्दल हरीभाऊ सगरे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भाजप प्रमाणेच काँग्रेस गोटातही स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी अनेकजण इच्छुक होते.काँग्रेसकडून देखील स्वीकृत सदस्य पदासाठी अनेक नावे चर्चेत होते.परंतु चर्चेत आघाडीवर असलेली अनेक नावे ऐनवेळी मागे पडली अन् प्रा.डॉ.गजेंद्र तरंगे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे स्वीकृत सदस्याची माळ पडली! डॉ.गजेंद्र तरंगे म्हणजे निलंगा शहराच्या शिक्षण क्षेत्रातील एक मोठं नाव होय!त्यामुळे त्यांच्या निवडीचेही शहरातील सर्वच स्तरातू स्वागत होत आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *