भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई. 02-06-2025 वमहाराष्ट्रातील मच्छीमार बांधव आणि भगिनींच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी, राज्याचे मत्स्य विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात एका विशेष ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘जनता दरबार’ मध्ये राज्यातील विविध भागांतून आलेल्या मच्छीमार समुदायाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
गेल्या काही वर्षांपासून मच्छीमार समुदाय नैसर्गिक आपत्ती, डिझेलच्या वाढत्या किमती, मासेमारीचे घटते प्रमाण, पारंपरिक मासेमारीवरील निर्बंध, तसेच बंदरांमधील पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री नितेशजी राणे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला हा ‘जनता दरबार’ मच्छीमारांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला.

या ‘जनता दरबार’मध्ये मंत्री नितेशजी राणे यांनी स्वतः मच्छीमार बांधव-भगिनींच्या समस्या, त्यांच्या मागण्या आणि अपेक्षा शांतपणे ऐकून घेतल्या. उपस्थितांनी आपल्या व्यवसायापुढील आव्हाने आणि शासनाकडून अपेक्षित असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. अनेक मच्छीमारांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपातही सादर केल्या.
या ‘जनता दरबार’मुळे मच्छीमार समुदायाला थेट शासनासमोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली . मंत्री महोदयांनी मच्छीमार बांधवांच्या समस्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले .



