मुंबई: ऐतिहासिक सभा मोदीराज एकत्र – आणि साहेबांनी तमाम महाराष्ट्र वासियांना अभिमान वाटेल अशा मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केल्या.
आज पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आयोजित प्रचारसभेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
– पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे श्री. नरेंद्र मोदी हे बरोबर २१ वर्षांनी शिवतीर्थावर आले आहेत. त्यावेळेस आपण कमळातून बाहेर आला होतात आणि २०१४ ला आपण कमळाला बाहेर काढलंत.
– २०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यँतचा लेखाजोखा मांडूया.
– इतर वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवला. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९ ते २०२४ काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो.
– राम मंदिर उभारणीच्या आमच्या आशा मावळल्या होत्या पण मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं आणि त्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभली.
– अनेक वर्ष प्रलंबित कश्मीरला विशेष दर्जा देणार ३७० कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. त्यामुळे कश्मीर हे भारतातील इतर राज्यांप्रमाणे आपलंच आहे, हे त्यानंतर वाटू लागलं.
– शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन.
– आता २०२४ नंतर जेव्हा मोदीजी आपण पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हाल त्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या काही अपेक्षा आपण पूर्ण कराल अशी आशा आहे.
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी.
– जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा.
– शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं.
– देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा.
– तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही.
– आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, ओवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत त्यावर कायमचा चाप बसवा.
– आणि शेवटची मागणी म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या.


