कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात आणि आनंदात पार पडला.
महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांची विशेष सत्रे आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, सुहास कांदे यांची विशेष सत्रे पार पडली. तर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या सात शिवसैनिकांच्या नावाने सात नवे पुरस्कार सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
त्यासोबतच राम भोजने यांचे ‘निवडणूक नियोजन’ मंदार भारंबे आणि मिलिंद शिंदे यांचे ‘संभाषण कौशल्य’ केतन जोशी यांचे ‘सोशल मीडिया’ आणि संजय उपाध्ये यांचे ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावरील विशेष सत्रे पार पडली.

यानंतर समारोपाच्या भाषणात मी माझी भूमिका विस्तृतपणे मांडली. सगळ्यात आधी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झटलेल्या सर्व शिवसैनिकांचे आभार मानले. महाअधिवेशनाच्या निमित्ताने करवीरनगरीत भगवे शक्तीपीठ अवतरले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याहाती आहे ही जमेची बाजू आहे. या अधिवेशनात अनेक महत्वाचे ठराव आपण संमत केले असून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येतील राम मंदिर बांधण्याचे तसेच ३७० कलम रद्द करण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा अभिनंदनाचा ठराव संमत केल्याचे सांगितले.

#शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही दीड वर्षांपूर्वी हे धाडस केले होते उलट तुम्ही जनमताचा अनादर करून पहिल्यांदा आणि मोदींना दिल्लीत खोटे आश्वासन देऊन दोनदा गद्दारी केल्याचे सांगितले. खोके खोके म्हणून डिवचणाऱ्यांना खोके नव्हे कंटेनर लागायचे हे मला माहित आहे. आमच्यावर आरोप करताना लाज वाटायला हवी असे मत व्यक्त केले. बाळासाहेब असेपर्यंत मातोश्री हे मंदिर होते, मात्र आता ते भकास झाले आहे. तिथून फक्त शिव्याशाप ऐकायला मिळत आहेत. माझ्या दाढीवर घसरलात पण या दाढीला तुमच्या नाड्या चांगल्या ठाऊक आहेत असे सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकायचा आहेत. प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदीजी हेच आपले उमेदवार आहेत असे समजून पूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे आदेश यावेळी सगळ्यांना दिले.
याप्रसंगी शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री, खासदार, आमदार, उपनेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


