अनंत आकाश… एका राजहंसाची गोष्ट स्व. अनंत तरे यांच्या राजकीय सामाजिक जीवनावरील पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटÎगृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते `गिनीज बुक ऑफ’ रेकॉर्ड ठरलेले ठाणे नगरीचे माजी महापौर अनंत वामन तरे यांच्या जीवन चरित्रावरील योगेश बाळाराम कोळी लिखित `अनंत आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी तरे

कुटुंबियांसह अनंत तरे यांचे मित्रवर्य, सहकारी आणि हजारो ठाणेकरांनी गडकरी रंगायतन भरगच्च भरले होते. अनंत तरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग बारकाईने टिपण्यात योगेश कोळी यांनी कुठेच कसर सोडली नाही हे पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून लक्षात येते. कोळी समाजाचे नेते, नगरसेवक, महापौर ते आमदार आणि शिवसेना उपनेते असा अनंत तरे यांची जीवनप्रवास उलगडताना त्यांच्यातील कर्तृत्व आणि नेतृत्वाची ठाणेकरांना आठवण करून देते.
पुस्तकाच्या सुरूवातीलाच श्री सिद्धीविनायकाची प्रतिमा, आगरी-कोळी बांधवांची देवता आई एकविरादेवीचे दर्शन साक्षात सिद्धीविनायक आणि एकविरा कार्लागडावर जावून आल्याचा भास निर्माण करतात. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अनंत तरे यांचे आई-वडील यांच्या समृतीस अभिवादन आणि अनंत तरेंसह सौ. हेमलता तरे आणि जयेश तरे यांना आदरांजलीचे चित्र वाचकांच्या डोळ्यात टचकन पाणी आणून आठवणींना उजाळा देते. मग सुरू होतो अनंत आकाशमधील लेखक योगेश कोळी यांच्या मनोगताने. अनंत तरेंच्या स्वयंप्रकाशित कार्यजीवनावर प्रकाश टाकत पक्ष, मित्र परिवार, शिवसेना नेते, कार्यकर्ते, आगरी-कोळी समाज, आई एकविरा देवीचे भाविक-भक्त, राज्यातील आगरी-कोळी आणि मच्छिमार बांधवांसह अनंत तरे यांचा जीवनपट उलगडत जातो. अनंत तरे यांची अशोगाथ जन्माला येण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभलेल्या तरे कुटुंबाचे ऋणनिर्देश योगेश कोळी यांनी व्यक्त केले आहेत. या लेखनासाठी ज्यांचे ज्यांचे साहित्य, छायाचित्रण, टिपण लाभले त्या सर्वांचेच अगदी छपाईपर्यंत सर्वांचेच आभार प्रकट करणारे मनोगत हे `अनंत आकाश’ ठाणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचून अनंत तरे यांच्या आठवणी कायम हृदयात कोरून ठेवेल यात शंका नाही.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची प्रस्तावना खुपच बोलकी आहे. पुस्तकाच्या लेखकाचा परिचय या पुस्तकातील लेख वाचताना भावेंना झाला. त्यावेळी योगेशच्या शब्दांतील तळमळ, अस्वस्थता, प्रेम, निष्ठा यांचा उलगडा करून दिला. यावेळी भावेंनी बाळासाहेब ठाकरे आणि अनंत तरे यांच्या भेटीच्या आठवणीचे प्रसंगही खुप सुंदररित्या यात पेरले आहेत. `ठाण्यात अनेक तलावांत बदके असली तरी या ठाण्याचा राजहंस होता’ हे लेखकाचे भावणारे निरीक्षण वाचकांच्या मनात रुंजी घालतो. अनंत तरेंच्या अनंत आठवणी या आभाळाएवढÎा आहेत. त्या एका पुस्तकाने संपूच शकत नाहीत, इतक्या सुंदर आठवणी लेखकाने जपल्याने यातून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणार्या तरुणांना उर्जा मिळू शकते, असे तरल मनोगत भावे यांनी मांडले आहे.
अनंत तरे यांना जवळून पाहिलेल्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी दादा अनंत तरे यांच्यासोबतच दरवर्षी 6 जूनला एकविरेला जावून भक्तीगीतांचा कार्यक्रम हा नित्याचा होता. बहिणीसारखं प्रेम देणारा भाउ आज आपल्यातून निघून गेले तरी त्यांची बहिणीचा माया आजही कायम असल्याची आठवण त्यांनी उलगडली.
पितृलुल्य व्यक्तिमत्व असे त्रिविक्रमी महापौर, माजी आमदार, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे संस्थापक स्व. अनंत तरे यांच्या कायमस्वरुपी आठवणी या सदरात जपल्या आहेत.
`तो राजहंस एक’ या लेखातून एक देखणा, रुबाबदार आणि सदैव कपाळावर लालभडक टिळ्यामुळे लाखातही उठून दिसणारा एक तडफदार माणूस या ठाण्यानं पाहिला. राजकारण आणि समाजकारण याच्यापलिकडेही अनंत तरे यांनी माणसं जपली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा भक्त, निष्ठावान कार्यकर्ता अखेरपर्यंत अनंत आणि अनंतच राहिला. ठाण्यातील राबोडी कोळीवाडÎातील त्यांची सुरुवात, बँकेतील नोकरी आणि त्यानंतर राजकारणात शिवसेनेचा शिलेदार म्हणून केलेली सुरूवात बाळासाहेबांचा शब्द आणि बाळासाहेबांचे नाव त्यांनी संचित केले. गेली 20 वर्षे कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहिलेले अनंत तरे यांनी गडाचा कायापालट केला. भाविकांच्या अडचणी दूर केल्या. अनेक योजना आणल्या. एक श्रद्धास्थान आणि पर्यटनस्थळ म्हणून हे गड कसं विकसित होईल यासाठी त्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत या लेखात अधोरेखित केली आहे. एक सेवाव्रती व्यक्तिमत्व ठाण्यातील अनेक तलावांमध्ये बदके असतात. मात्र राजहंस एक इतकी सुंदर मांडणी केलेली आहे.
`रत्नात शोभणारा कौस्तुभ मणी’ अनंत तरे हे उमदे व्यक्मित्व राजबिंडा चेहरा, भारदस्त शरीरयष्टी ही नेहमीच सर्वांवर छाप पाडत असे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनीच कामाचा एवढा मोठा डोंगर उभा केला होता की त्यांनी कधी मागे वळून पाहिलच नाही. `आध केले मग सागितले’ या उक्तीप्रमाणे त्यांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच भावली. मी कोणी मोठा आहे असा भाव त्यांच्या चेहर्यावर अजिबात नसायचा. बुद्धीमत्तेला विनोदाची झालर होती म्हणूनच ते ठाणेकरांना अधिक प्रिय होते. त्यातूनच. त्यांनी त्रिविक्रमी महापौरपदाची कारकिर्द गाजवली. महाराष्ट्र कोळी समाज संघाचे नेतृत्व, मच्छिमारांच्या समस्या, त्यांनी दिलेले लढे यांचाही उलगडा यात केला आहे.
तरे कुटुंबाची पार्श्वभूमी ठाणेकरांना परिचित आहे. तरी लेखका अगदी महापौर असल्यापासून शिवसेना उपनेतेपदापर्यंत तरेंच्यच जीवनातील चढउतार यात मांडण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील श्रीगणेशा, महापौरपदाची त्रिविक्रमी घोडदौड, विधान परिषदेतील आमदारकीचा प्रवास, आगरी-समाजाचा दीपस्तंभ या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यात आला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहणारे तरे हे जात, गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना असल्याची जागृती त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेने करून दिली. बाळासाहेबांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा धागा पकडत अनंत तरे यांनी समाजाशी आपली नाळ जुळवून ठेवली.
अखेर आई एकविरा देवीचा आशीर्वाद सदैव तरे कुटुंबिय आणि एकविरा भक्तांना लाभल्याचे खुप सहजरित्या विश्लेषण केले आहे. साधुसंत येती घरा तोचि दिवाळी – दसरा या युक्तीप्रमाणे दरवर्षी दिवाळी पाडव्याला साधुसंतांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांची पुजा अर्चा, भोजन आणि भेट देत सेवा करणारा अवलिया धार्मिक वृत्ती आणि स्नेहभाव जपणारा असल्याचेही कोळी यांनी मांडले आहे. पुस्तकाच्या शेवटी अनंत तरे यांच्या स्नेहींच्या प्रतिक्रिया आपल्याला आनंद पार्क या येथे घेउन जातात. अनंत तरे यांच्या `अनंत आठवणींचा खजिना’ या पुस्तकात दडलेला आहे. विशेष म्हणजे अनंत तरे यांने आपल्या समाज बांधवांच्या भावना, समस्या, प्रश्न मांडण्यासाठी `भूमीपुत्र’ हे साप्ताहिक वृत्तपत्र चालविले होते. संपादक म्हणून अनंत तरे आणि व्यवस्थापक म्हणून योगेश कोळी यांनी मांडणी केली होती. तरे यांचा पत्रकारांशीही स्नेहभाव होता. अशा अनंत आठवणी आहेत. यासाठी दुसरी आवृत्ती यावी हीच अपेक्षा!
अनंत आकाश लेखक – योगेश कोळी
पृष्ठ : 120
मूल्य : 350/-

उद्धव ठाकरेंनी आपल्या मनोगता मध्ये म्हटले की,
जर मी स्वर्गीय अनंत तरे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या विषयीच्या सूचना ऐकल्या असत्या तर शिवसेना फुटलीच नसती! पश्चाताप व्यक्त करत ठाकरेंनी द्रष्ट्या शिलेदाराची आठवण काढली
उद्धव ठाकरेंनी दिवंगत अनंत तरे यांच्या आठवणींना उजाळा देत एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तरे यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर चार वर्षांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती, जी आता खरी ठरल्याचे ठाकरे म्हणाले. तरे यांच्या ‘अनंत आकाश’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ठाकरेंनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.


