Headlines

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची गावपातळीवर सुविधा.. नारी शक्ती दुत ॲप द्वारे पण पात्र महिला स्वतः अर्ज करू शकतात

*मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची गावपातळीवर सुविधा*

• अर्ज भरण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहणार

• प्रत्येक पात्र महिलेच्या नोंदणीसाठी प्रशासनाकडून मोहीम

• दर शनिवारी, बुधवारी यादीचे होणार चावडी वाचन

• गाव ते जिल्हा पातळीवर समिती करणार संनियंत्रण

*लातूर, दि. 10 (जिमाका) :*
राज्यातील मुली व महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनाही 1 जुलै 2024 पासूनच लाभाची दरमहा 1 हजार 500 रुपये रक्कम दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रशासनामार्फत गाव पातळीवरही सुविधा उपलब्ध करून दिली असून ग्रामस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यामुळे महिलांनी एकाच वेळी गर्दी न करता टप्प्या-टप्प्याने आपले अर्ज सादर करावेत. तसेच एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी ‘नारीशक्ती दूत-Narishakti doot’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून वैयक्तिक अर्जदार ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत. तसेच महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहणार असल्याने महिलांनी एकाच वेळी गर्दी न करता आपले अर्ज भरावेत. प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचे जिल्हास्तरावर संनियंत्रण केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद आणि महापालिका स्तरावर झालेली ऑनलाईन नोंदणी, महा ई-सेवा केंद्र तथा आपले सरकार सेवा केंद्रातून भरण्यात आलेल्या अर्जांचा आढावा घेतला जाणार आहे.

राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, त्यांच्या सशक्तीकरणास चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिलांना या योजनेंतर्गत दरमहा 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार, कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

*योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*

• आधारकार्ड
• अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक.
• उत्पन्नाचा दाखला अथवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड,
• अर्जदाराचे विहित नमुन्यातील साध्या कागदावरील हमीपत्र,
• बँक पासबुक,
• अर्जदाराचा फोटो,
• महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.

*गावपातळीवर अर्ज स्वीकारण्यासाठी समिती; यादीचे होणार चावडी वाचन*

या योजनेचे अर्ज शहरी भागात वार्ड स्तरावर आणि ग्रामीण भागात गाव पातळीवर स्वीकारण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात संबंधित गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बचतगटाच्या महिला, आशा सेविका यांच्यामार्फत महिलांना आपले अर्ज ऑफलाईन स्वरुपात सादर करता येणार आहेत. त्यानंतर हे अर्ज ऑनलाईन भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी बँक खात्याला आधार क्रमांक सलंग्न असणे आवश्यक आहे. तसेच ऑफलाईन अर्ज सादर करताना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत जोडणे गरजेचे आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ऑफलाईन अर्ज छाननी करून अपलोड करण्यासाठी तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली गावपातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये आशा सेविका, उमेदच्या सीआरपी, माविमच्या सहयोगिनी सदस्य असून ग्रामसेवक सदस्य सचिव असतील, तर अंगणवाडी सेविका सहसचिव राहतील. एकदा ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर महिलांना पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही. प्राप्त अर्जांची यादी तयार करण्यात येणार असून तिचे प्रत्येक बुधवारी व शनिवार चावडी वाचन करण्यात येणार आहे. यावेळी यादीवर हरकती मांडता येणार आहेत.

*योजनेची माहिती देण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर मदत कक्ष*

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची कार्यवाही जिल्ह्यात राबविण्यात येत असून या योजनेची अचूक माहिती लाभार्थ्यांना देण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तालुकास्तरावर तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद तथा नगरपंचायत याठिकाणी, तसेच जिल्हास्तरावर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात मदत कक्ष राहणार आहेत. तसेच 181 या टोल फ्री क्रमांकावर किंवा  लातूर जिल्ह्यातील लोका साठी 02382-299680 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून या योजनेची अधिक माहिती प्राप्त करून घेता येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

नारी शक्ती दुत या ॲप मध्ये महिलांच्या इतर 22योजनांची पण माहिती आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *