Headlines

राजकारणातील निष्कलंक सोज्वळ चारित्र्यवान नेतृत्व काळाच्या पडद्याआड  शिवराज पाटील चाकूरकरांचे 91 व्या वर्षी निधन.

शिवराज पाटील चाकूरकर :

जन्म – 12 ऑक्टोबर 1935

मृत्यू – 12 डिसेंबर 2025

– राजकीय कारकीर्द –

नगराध्यक्ष लातूर – 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970

आमदार लातूर – 1972 ते 1980

विधानसभा उपाध्यक्ष – 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978

विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र – 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979

लोकसभा सदस्य, लातूर – 1980 ते 2004

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री – 1980 ते 1982

केंद्रीय वाणिज्य मंत्री – 1982 ते 1983

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री – 1983 ते 1984

लोकसभा उपसभापती – 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991

लोकसभा सभापती – 10 जुलै 1991 ते 22 मे 1996

केंद्रीय गृहमंत्री – 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008

राज्यसभा सदस्य – 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010

पंजाब राज्यपाल – 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015

लातूर दि १२-१२-२०२५ – गेली सहा दशके लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व देशाच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व लातूरचे नगराध्यक्ष ते राज्यपाल असा राजकीय प्रवास करणारे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे.चाकूरकर यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे खास दिल्लीवरून लातूरला आले होते.मात्र लातूरला आल्यानंतर अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली.चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानीच उपचार करत होते.डॉक्टरांची टीम देखील सोबत होती.5 डिसेंबर पासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखीनच खालावली होती,अगदी अन्नपाणी देखील घ्यायला चाकूरकर यांनी नकार दिला होता.अश्या परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची देखील चाचपणी करत अगदी तयारी देखील केली होती.चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी आवश्यक यंत्रणा देखील आणायची तयारी केली होती.मात्र स्थानिक डॉक्टरांनी अश्या परिस्थितीमध्ये शिफ्ट करणे योग्य नाही असा सल्ला दिल्याने चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.व अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली असून लातूरच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.लातूरचे नगराध्यक्ष ते पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली.गांधी परिवाराचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख.सोबतच 60 वर्षाच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप नाही,राजकीय डाग नाही,भ्रष्टाचाराचे आरोप नाही,शुद्ध चरित्र हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले.त्यामुळे 6 दशकांचा निष्कलंक राजकीय प्रवास थांबला असे म्हणावे लागेल.त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील,सून अर्चना पाटील व दोन नाती असा परिवार आहे.पंजाबचे राज्यपाल या पदावरून पायउतार झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणात सक्रिय नव्हते.लातूरचे नगराध्यक्ष, आमदार ते खासदार असा 1967 पासून 2004 पर्यंत राजकीय प्रवास करत असताना त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही.मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला,व त्यांनी कधीही निवडणुकीत सहभाग घेतला नाही.लातूर लोकसभा मतदारसंघ हा 2009 ला राखीव झाल्याने चाकूरकर हे शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील असे कायम बोलले गेले,मात्र 2004 नंतर चाकूरकर यांनी कोणतीही निवडणूक लढली नाही.60 वर्ष लातूर,मुंबई पासून दिल्लीपर्यंत राजकारण करत असताना आपल्या नेतृत्वाला चाकूरकरांनी कधी जातीय रंग येऊ दिला नाही.किंवा एका ठराविक जातीचे नेतृत्व म्हणून चाकूरकरांना कधी शिक्का बसला नाही.लिंगायत समाजातून चाकूरकर येत असले तरी त्यांनी स्वतःला मर्यादीत कधीही करून घेतले नाही,किंवा तसा संदेश जाईल अशी कृती देखील आपल्या हातून होऊ दिली नाही.सर्वपक्षीय संबंध असलेले चाकूरकर यांना ते ज्या लातूरमधून नेतृत्व करायचे त्याच लातुरातील मुस्लिम समाज खूप मानायचा.त्यांचे एक वेगळे व आदराचे स्थान समाजात होते,अगदी शेवटपर्यंत राहिले.असलेला प्रचंड अभ्यास, मराठी,इंग्रजी, हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व व प्रभावी मांडणी हे चाकूरकर यांच्या राजकीय प्रवासाचे विशेष गुण राहिले.त्यांच्या निधनाने एक अभ्यासू,सर्वधर्म समभाव मानणाऱ्या व त्यांची अंमलबजावणी आपल्या कृतीतून करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी चाकूरकर यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे असे नक्कीच म्हणता येईल.

 

राजकीय टीका व पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही.

राजकारणात कुरघोडी करणे,एकमेकांचे पाय ओढणे ,पाठ फिरली की विरोधात बोलणे असे प्रकार कांही नवीन नाहीत.हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे.मात्र नगराध्यक्ष ते राज्यपाल पदापर्यंतचा राजकीय प्रवास पार करत असताना कधी कोणाविषयी राजकीय टीका आपल्या भाषणातून सोडा,खाजगीमध्ये देखील शिवराज पाटील चाकूरकर यांनी केली नाही.1991 ला नगर परिषद निवडणुकीत चाकूरकरांना वीरोध म्हणून विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या विरोधात स्वतः मंत्री असताना उमेदवार देत राजीव मंच या नावाखाली निवडणूक लढली.काँग्रेसचे उमेदवार पाडले.आणि एस आर देशमुख यांना नगराध्यक्ष केले,त्याच एस आर देशमुख यांना पुढे करून आजच्या राजीव गांधी चौक येथे बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्याचे निश्चित झालेले असताना रातोरात एस आर देशमुख यांनी त्याठिकाणी राजीव गांधी यांचा पुतळा आणून बसवला आणि मोठा गोंधळ लातुरात झाला.मात्र यात शिवराज पाटील चाकूरकर यांना लिंगायत समाजात बदनाम करण्याचा आणि त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चाकूरकरांना फटका बसावा असा हेतू होता.पुढे 2004 ला तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी मिळून रूपाताई पाटील निलंगेकर यांना चाकूरकर यांच्या समोर उभा करून पराभव केला हे जगजाहीर होते.अगदी लातूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर पार्कवर झालेल्या कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर व्यासपीठावर असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मी आणि विलासराव देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना कसे लोकसभा निवडणुकीत पाडले याची जाहीर कबुली दिली होती.त्याला प्रतिउत्तर म्हणून चाकूरक यांनी एक शब्द आपल्या भाषणात काढला नाही.किंवा नंतर देखील त्या निवडणुकीचा कोठे उल्लेख देखील चाकूरकरांनी केला नाही.बाकी कोणाच्या विरोधात बोलणे, किंवा लूज टॉक न करणे,अगदी आपल्या विरोधकांविषयी देखील अपशब्द न काढणे हे देखील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य राहिले.

 

2009 चे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि देवघरचे कनेक्शन

2007 साली लातूरच्या जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे सरकार आले आणि छाया चिगुरे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या.2009 साली अर्थात अडीच वर्षांनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बदलण्याची निवडणूक सुरू झाली.त्यावेळी नुकतेच विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचे केंद्रीय गृहमंत्रीपद मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गेले होते.विलासराव देशमुख हे केंद्रात गेले होते.मात्र चाकूरकर त्यावेळी कोठेही नव्हते.अश्या परिस्थितीत लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली.आणि काँग्रेसकडून अर्थात विलासराव देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी त्र्यंबक भिसे आणि उपाध्यक्षपदासाठी दिलीप पाटील नागराळकर यांचे नाव सुचवले. आणि साहजिकच संख्याबळ असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सहज होतील अशी परिस्थिती असताना अचानक अध्यक्षपदासाठी पंडित धुमाळ व उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला व ते निवडून देखील आले.आणि राज्यात ही बातमी पसरली.त्या प्रक्रियेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर व माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी पुढाकार घेत ही राजकीय उलथापालथ केली होती.त्यावेळी विलासराव देशमुख यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करत,लातुरात बंडखोरी झाली आहे व ही राजकीय घडामोड देवघर अर्थात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरून झाली आहे असा संदर्भ दिला.तात्काळ नेतृत्वाने शिवराज पाटील चाकूरकर यांना पक्षाने या विषयात विचारणा केली असता चाकूरकरांनी या विषयात बसवराज पाटील मुरूमकर यांना काय चाललंय लातुरात अशी विचारणा केली,त्यावेळी मुरूमकर देवघर या चाकूरकरांच्या निवासस्थानीच होते. त्यावेळी बसवराज पाटील मुरूमकर यांनी चाकूरकरांना उत्तर देत साहेब जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेत ते कॉंग्रेसचेच आहेत,त्यावर चाकूरकर यांनी मुरूमकर यांना नक्की का ? असा प्रश्न उपस्थित केला,त्यावर मुरूमकरांनी होय साहेब काँग्रेसचेच लोक निवडून आले आहेत असे सांगितले असता चाकूरकरांनी असे असेल तर पुढे जा,मी सोबत आहे असे मुरूमकरांना आदेश दिले.आणि नंतर पंडित धुमाळ व संभाजी पाटील हे अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले व त्यांनी आपला कार्यकाळ देखील पूर्ण केला.

 

केलेल्या कामाचे श्रेय न घेणारे राजकारणी चाकूरकर

राजकारणात मतांसाठी, प्रसिध्दीसाठी एखादे काम केले नसेल तर ते आपल्यामुळे झाले हे सांगण्याची केविलवाणी धडपड सर्वश्रुत आहे.मात्र न केलेले तर सोडा केलेल्या कामाची देखील प्रसिद्धी किंवा श्रेयवादाचा प्रकार शिवराज पाटील चाकूरकरांनी केला नाही हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे असे अधोरेखित करावे लागेल.लातूर – मुंबई रेल्वेसाठी आवश्यक प्रक्रिया ही चाकूरकरांनी केली याची कधीही वाच्यता चाकूरकरांनी केली नाही.आज जे सहकाराचे जाळे लातूर जिल्ह्यात मांजरा परिवाराने उभे केले,ज्याची सुरुवात मांजरा सहकारी साखर कारखान्यापासून सुरुवात झाली त्या मांजरा साखर कारखान्याची परवानगी ही शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे मिळाली हे बहुतांश लोकांना माहिती नाही.असे अनेक निर्णय चाकूरकरांनी नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असताना केले.पण हे काम मी केले,हे माझ्यामुळे झाले असे श्रेय घेण्याचे किंवा प्रकाशझोतात राहणे यापासून शिवराज पाटील चाकूरकर हे दोन हात लांब राहिले. यापुढे जाऊन चकूरकरांनी केलेल्या कामाचे श्रेय इतर कोणी घेतले तरी चाकूरकर शब्द देखील काढत नव्हते.असे राजकीय नेतृत्व नक्कीच विरळ असते जे नेतृत्व चाकूरकरांनी केले.

लातूर शहराचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांची प्रतिक्रिया: माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी लोकसभा सभापती, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अत्यंत निष्पृह वृत्तीने राज्यातील आणि देशातील जनतेची सेवा केली, लातूर शहर, लातूर जिल्हा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचे हे सृजनशील, पारदर्शक कार्य सर्वांनाच कायम प्रेरणा देत राहणारे आहे. लोकसेवेचे त्यांचे कार्य त्यांनी दाखवलेल्या सन्मार्गाने पुढे नेण्याचा प्रयत्न राहील अशी भावना लातूर येथील देवघर निवासस्थानी सहकाऱ्यांसह जाऊन आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर बोलताना माजी मंत्री आमदार अमित भैया देशमुख यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

 

शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. साधेपणा आणि नैतिक मूल्यांचे ते प्रतीक होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदं भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली.

 

लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील.

खासदार,सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया: लोकसभेचे माजी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी तब्बल सात वेळा लातूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यासोबतच केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या खात्याची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली. ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक देखील होते. त्यांच्या निधनामुळे संसदीय कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनामुळे त्यांचे पुत्र शैलेश चाकूरकर पाटील, कार्यकर्ते आणि चाकूरकर कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *