Headlines

पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव!

‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे ‘पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ आणि त्यांच्या ‘सिंहायन’ आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा कार्यक्रम अतिशय विशेष आहे. मंचावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत, हेच पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी समाजात कमावलेले प्रेम आणि आदर दर्शवते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहस्रचंद्रदर्शन म्हणजे केवळ एक आयुष्य नव्हे, तर अनुभव, कार्य आणि सेवेचा परिपाक आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रकाशित झालेले ‘सिंहायन’ हे केवळ आत्मचरित्र नसून, महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक प्रवासाचा मागोवा आहे.

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले असून, ‘पुढारी’ या वृत्तपत्रातून त्यांनी जनतेचा आवाज बनून अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. कोल्हापूरच्या ऊस उत्पादकांच्या प्रश्नांपासून ते मराठा आरक्षणापर्यंत समाजहिताच्या मुद्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, व्यक्ती निवृत्त होते, परंतु विचार निवृत्त होत नाहीत. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेपासून समाजकारणापर्यंत दिलेले योगदान पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. ‘रेडिओ’च्या युगातून ‘डिजिटल’ युगातही ‘पुढारी’ने आपले अस्तित्व जपले, हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर येथे पूर्ण खंडपीठ स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेला प्रस्ताव लवकरच मंजूर होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार शरद पवार, मंत्रीगण व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *