Headlines

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना धक्का ! चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग प्रमुखपदी नियुक्ती

 

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर महत्वाचे बदल होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यापूर्वी मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख होते. ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता त्यांच्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील डॉ. रामेश्वर नाईक यांची वर्णी लागली आहे.

२०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची स्थापना केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम किती प्रभावीपणे होऊ शकते याची पहिल्यांदा प्रचिती आली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पदावर काम करताना मंगेश चिवटे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.Z

तर आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदी नियुक्त झालेले डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१४ साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते.

यानंतरच्या काळात त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले. जुलै २०२१ मध्ये रामेश्वर नाईक वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तर ऑक्टोबर २०२३ मध्ये राज्यातील धर्मादाय संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *