Headlines

शिवसेना उबाठा चे नेते संजय राऊत यांच्या औसातील टीकेला आमदार अभिमन्यू पवार यांचे सडेतोड उत्तर

औसा येथे सभेत बोलताना शिवसेना ऊबाठा चे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या रेटून बोलण्याच्या ओघात आमदार अभिमन्यू पवार यांना  आपण काय केले याचा हिशोब विचारला त्यावर आमदार अभिमन्यू पवार यांची सोशल मीडियावर दिलेले उत्तर समर्पक वाटले ते जसेच्या तसे वाचा…

संजयजी राऊत यांना सविनय आणि सस्नेह.….

महाराष्ट्राच्या राजकारणातील किळसपात्र, रोज सकाळी माध्यमांसमोर गरळ ओकणारा भोंगा आज भर दुपारी औसात वाजला. मी सहसा कोणावर राजकीय टीकाटिपण्णी करायला आणि कोणी टीकाटिपण्णी केली तर त्याला उत्तर द्यायला जात नाही. पण वाचाळवीर खासदार श्री संजयजी राऊत यांनी “औसासाठी आणि लातूरला मी काय केलं याचा हिशोब द्यावा” अशी विचारणा केली म्हणून हा उत्तरप्रपंच…

 

⏭️ श्री संजयजी आपण लातूरवरून औसाला आलात, लातूर शहरात तुम्हाला राजीव गांधी चौक लागला असेल त्या राजीव गांधी चौकापासून लामजना पाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत १० मी रुंदीचा ३५० कोटी रुपयांचा रस्ता मंजूर करून आणला आहे, २-३ वर्षांनी तुम्ही पुन्हा औसाला आलात तर त्याच मार्गाने जाल.

⏭️ विजय मंगल कार्यालयात जाण्यापूर्वी तुमच्या सहकाऱ्यांनी तुम्हाला टी पॉईंटवरून बहुतेक औसा शहरात नेलं नाही, अन्यथा तुम्हाला औसा शहरातील भव्य नूतन बसस्थानक नक्की बघायला मिळाले असते, औसा येथे कार्यान्वित झालेले वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय बघायला मिळाले असते, तुम्हाला शहरात बांधकाम सुरु असलेले १४ सार्वजनिक शौचालय बघायला मिळाले असते (१४ सार्वजनिक शौचालय होत असलेली औसा ही क दर्जाची राज्यातील एकमेव नगरपालिका आहे). आणि हो त्याच रोडवर २५ खाटांचे औसा ग्रामीण रुग्णालय ज्याला काही दिवसांपूर्वीच १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात दर्जोन्नत करण्यास मी मंजुरी मिळवली आहे.

⏭️ विजय मंगल कार्यालयातून तुम्ही लामजनाला गेलात, लामजना पाटीवर मान थोडी वाकडी करून उजवीकडे बघितला असतात तर तुम्हाला एका ग्रामपंचायतच्या गावात बांधलेले १.५ कोटींचे बसस्थानक बघता आले असते.

लामजना पाटीवरून किल्लारीकडे जाताना उजव्या साईडला वाट वाकडी करून ०.५ किमी गेला असतात तर तुम्हाला “राजमाता जिजाऊ – शाळा माझी न्यारी” या अभियानाअंतर्गत मी जिल्हा परिषद शाळेत सीएसआरमधून उभारत असलेल्या जागतिक दर्जाच्या शिक्षण सुविधा नक्की पाहता आल्या असत्या.

⏭️ पुढे किल्लारीत नणंद मोडला थांबला असतात तर तुम्हाला कळले असते मी मातोळा – आशिव – किल्लारी – सिंगनाळ या रस्त्यासाठी ४५० कोटी रु. नुकतेच मंजूर करून आल्याचे कळले असते. आणि हो दोनच दिवसांपूर्वी किल्लारीतील ४५३ कुटुंबांचा २२ वर्षांपासून रखडलेला ८ व्या व ९ व्या फेरीतील कबाले वाटपाचा विषय निकाली काढल्याचेही तुम्हाला कळले असते.

⏭️ थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला मान वाकडी करून पाहिली असती तर १५ वर्षांपासून बंद असलेल्या आणि तुमच्या सरकारने विक्रीस काढण्याचा घाट घातलेल्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून येत असलेला धूर तुम्हाला दिसला असता. गाडी थांबवून एखाद्या दुकानदाराला विचारलं असतात तर कळलं असतं की ६५००० गाळप पूर्ण झाले आहे. तुमच्या सोबत असलेल्या काही जणांना तो कारखाना विक्रीस काढायचा होता म्हणून कदाचित तुम्हाला त्यांनी सांगितलं नसेल पण मी सांगतो; “९५ कोटींचे कर्ज आणि १५ वर्ष बंद असलेला हा कारखाना मी सहकारी तत्वावर पुनर्जीवित केला आहे”.

⏭️ त्याच किल्लारीत लवकरच अपर तहसीलदाय कार्यालय लवकरच मंजूर होणार आहे आणि हो, त्याच किल्लारीत लवकरच महाराष्ट्रातील दुसरे स्वतंत्र आयुष रुग्णालय उभारले जाणार आहे.

⏭️ किल्लारीवरून कासार सिरसीला जाताना नाईचाकूरच्या पुढे माझा मतदारसंघ लागल्यानंतर तुमच्या वाहनांचा वेग मंदावला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. कारण रामलिंग मुदगड, कासार सिरसी वाडी इत्यादी गावांजवळ रस्त्यांची कामे सुरु आहेत.

⏭️ कासार सिरसीत गेल्यावर शिरढोण मोडवरून उजवीकडे वळल्यावर पुन्हा तुम्हाला थोडा त्रास झाला असेल, १५ कोटींच्या शिरढोण मोड ते कासार सिरसी ग्रामीण रुग्णालय या मुख्य रस्त्याचे एका साईडचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या साईडचे काम प्रगतीपथावर आहे ना म्हणून.

⏭️ डाव्या साईडला कोराळी – कोराळी वाडीला जाणार रस्ता कोणी दाखवला की नाही तुम्हाला? हा तोच रस्ता आहे जो तुमच्या MVA सरकारने रद्द केला होता पण मी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तो रस्ता मंजूर करून आणला, त्याचेही काम प्रगतीपथावर.

⏭️ कासार सिरसीत गेल्यावर तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला भव्य बसस्थानक दिसले असेलच की. अनेक तालुक्यांच्या ठिकाणी नसेल इतके भव्य बसस्थानक ग्रामपंचायत असलेल्या कासार सिरसीत उभारले आहे.

⏭️ तुमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं नसेल पण विकासापासून कायम वंचित राहिलेल्या कासार सिरसीत स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आणि महावितरणचे उपविभागीय कार्यालय कार्यान्वित झालेले आहे. त्याच कासार सिरसीत कोट्यवधी रुपयांच्या शासकीय इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

⏭️ संजयजी, आपण विचारलात म्हणून सांगतो २५०० कोटींपेक्षा अधिकचा निधी मतदारसंघात आणला आहे. बुधोडा ते कासार सिरसी प्रवासादरम्यान मतदारसंघातल्या कुठल्याही गावात ५ मिनिटे थांबून विचारपूस केली असतात तर कळले असते की मतदारसंघात असे एकही गाव नाही जिथे आपण कोटीच्या खाली निधी दिला असेल. कुण्याही गावात गेला असतात तर २-४ शेतरस्ते, गोठे तुम्हाला नक्की पाहायला मिळाला असता.

⏭️ गोगलगाय प्रादुर्भावाने आणि संततधार पावसाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले तेंव्हा हा विषय विधिमंडळात मांडून आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निकषाबाहेर जाऊन ४२० कोटींची नुकसानभरपाई मंजूर करून आणल्याची माहिती आपण एखाद्या शेतकऱ्याशी संवाद साधला असतात तर सहज मिळाली असती.

⏭️ शेवटी एक विनंती आहे, जमलं तर परत जाताना औसा – तुळजापूर मार्गाने जा, नुकतीच बेलकुंड परिसरात मंजूर करून आणलेली २५० हेक्टरची एमआयडीसी तुम्हाला पाहायला मिळेल.

नवभारत वृत्त समूहाचा “नवभारत अचिएव्हर्स अवॉर्ड” स्वीकारण्यासाठी दुबईला जायचे आहे म्हणून मी मुंबईला आलो आहे, औसात असतो तर एक-एक विकासकाम स्वतः तुम्हाला सोबत फिरून दाखवले असते.

शेवटी एकच सांगतो, “मा देवेंद्रजींसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेतृत्वाला जेलमध्ये टाकण्याची भाषा जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या तोंडात हास्यास्पद वाटते”. तूर्त एवढेच……

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *