लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन 2025-26 मध्ये सेस निधीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) आणि स्लरी फिल्टर खरेदीसाठी डीबीटी तत्त्वावर अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. शेती खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी 29 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून घेऊन, आवश्यक कागदपत्रांसह (सातबारा, आठ अ उतारा, जातीचा दाखला (अनुसूचित जाती/जमातींसाठी), ट्रॅक्टरचा पुरावा (बीबीएफसाठी)) 15 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावेत. अर्जांची छाननी करून ज्येष्ठता सूचीनुसार पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिली जाईल. खरेदीनंतर मोका तपासणी होऊन अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात (डीबीटी) जमा होईल. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. योजनेबाबत माहितीसाठी संबंधित तालुका पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) किंवा जिल्हा परिषद येथील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दिपक सुपेकर यांनी केले आहे.
योजनेचे स्वरूप आणि अनुदान:
3 एचपी कडबाकुट्टी- खरेदी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 14 हजार रुपये.
5 एचपी कडबाकुट्टी- खरेदी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 17 हजार रुपये.
रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र- खरेदी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 32 हजार 500 रुपये.
स्लरी फिल्टर (टाकीसह)- खरेदी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 20 हजार रुपये.


