निलंगा : (राजेंद्र पवार)- कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी असलेले ८५ वर्षीय हरिश्चंद्र मुडे आणि माधव पिटले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना समाजातील लोक आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी आंदोलकांनी टि.सी., बोनाफाईड व वडिलधाऱ्या नातेवाईकांच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अकरा महिन्यांपूर्वी दाखल केलेले प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे, महाराष्ट्र शासनाने १९६६ प्रमाणे ३६ व ३६ अ नोंदणी आदिवासी खातेदार म्हणून कोळी समाजाच्या सातबाऱ्यावर नोंदणी करावी व त्याआधारे प्रमाणपत्र देण्यात यावे, वैधता प्रमाणपत्रासाठी रक्त नात्याचे परिपत्रक काढण्यात यावे, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे कोळी समाजालाही जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे, ढोर कोळी यांचा १९५० पूर्वीचा कोळी जमातीचा पुरावा ग्राह्य धरावा, अशा मागण्या मांडल्या.
हरिश्चंद्र मुडे या ८५ वर्षीय आजोबांनी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, त्यांनी अशी भावना व्यक्त केली की, तीन पिढ्यांपासून हाच प्रश्न कायम आहे. कोणतेही सरकार आले तरी समाजाचा प्रश्न सुटलेला नाही. ज्या जातीत जन्मलो त्याच जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून वर्षानुवर्षे झगडावे लागत आहे.

आंदोलनाचा आज सहावा दिवस असून जिल्हा व तालुका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पालकमंत्र्यांकडूनही कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नसल्यामुळे आंदोलकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आंदोलक प्रकृती अस्वस्थ असूनही कोणताही उपचार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


