Headlines

जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. 25 : आजवर अनेक चढ-उतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरविले. कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो. महापौर झालो. आमदार झालो. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुन्हा निवडून आलो. बहुमत असतांनाही राजकीय गणितांच्या गोळा बेरिजेमध्ये निराशा घ्यावी लागली. मला प्रत्येक क्षणी श्रद्ध्येय अटल बिहारी वाजपेयी यांचे हार नही मानुंगा हे शब्द प्रेरणा देत राहिले. आज पुन्हा कार्यकर्त्यांनी जी उत्स्फूर्त मेहनत घेतली, महाराष्ट्रातील मतदारांनी जो प्रचंड विश्वास दिला त्या विश्वासाच्या बळावर आज मला मुख्यमंत्री होता आले याची जाणीव असून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या विश्वासाला जीवापाड जपेन, असे भावोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्काराला उत्तर देतांना काढले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारोहात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोहास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री पंकज भोयर व विदर्भातील सन्माननिय आमदार उपस्थित होते.

आजवर नम्रतेने मी सत्कार टाळत आलो. मला नगरसेवक झाल्याची घटना आजही तेवढीच ताजी व कालच घडल्या सारखी वाटते. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रुपात मला पाहिले याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. यशाच्या पाठीमागे जनतेने टाकलेला विश्वास मला खुप मोलाचा वाटतो. या राज्यातील सर्व जनतेचा हा सत्कार आहे ही माझी भावना असून समाजातील प्रत्येक घटकाने दिलेला विश्वास सार्थकी लावेल असे त्यांनी स्पष्ट प्रतिपादन केले. हे यश राज्यातील सर्व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभात मुख्यमंत्र्यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *